शिवतीर्थासाठी राज ठाकरेंची छुपी खेळी... - Marathi News 24taas.com

शिवतीर्थासाठी राज ठाकरेंची छुपी खेळी...

Tag:  
www.24taas.com,दिनेश दुखंडे- मुंबई
 
मुंबई महापालिका निवडणूकीच्या प्रचाराच्या समारोपाची शिवाजी पार्कवर होणारी जाहीर सभा मनसेचीच व्हावी यासाठी पक्षानं तयारी सुरु केली...सभेसाठी शिवाजी उपलब्ध व्हावं यासाठी मनसेनं न्यायालयात धाव घेतली आहे...प्रतिस्पर्धी शिवसेनेला हे मैदान मिळू नये अशीही मनसेची छुपी खेळी आहे...मात्र शिवसेनाच यंदा शिवाजी पार्कसाठी उत्सुक नाही....
 
क्रिकेटची पंढरी मानल्या जाणा-या शिवाजी पार्कचं राजकीय पटलावरही तितकंच महत्त्व आहे...या मैदानावर सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शानाची संधी राजकीय पक्ष साधत असतात...शिवसेना आणि मनसेसाठी हे मैदान भावनिक मुद्दा बनतं...यंदा महापालिका निवडणूकीत शिवाजी पार्कवर प्रचाराची शेवटची सभा मनसेचीच व्हावी यासाठी मनसे प्रयत्नशील आहे...मोक्याच्या तारखेला मैदान मिळावं यासाठी मनसेनं व्यूहरचना आखली.
 
डिसेंबर महिन्यात मनसेनं १ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीतल्या प्रत्येक दिवसासाठी मैदान मनसेला मिळावं यासाठी स्थानिक महापालिका विभागीय कार्यालयात अर्ज केले...१६ फेब्रुवारीला निवडणूकीसाठी मतदान होणार आहे...14 तारखेच्या संध्याकाळी प्रचार संपतोय...हे ध्यानात घेत मनसेनं 12 आणि 13 फेब्रवारीच्या तारखांसाठी महापालिकेकडे शिवाजी पार्कची आग्रही मागणी केली...महापालिकेनं ही मागणी फेटाळली आहे. आता मनसेनं याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
 
खरंतर प्रचाराच्या अखेरच्या टप्प्य़ात शिवसेनेला जाहीर सभेसाठी शिवाजी पार्क मिळू नये ही मनसेची छुपी खेळी आहे...मात्र शिवसेनेनं या खेळीला फारसं महत्त्व न देण्याची भूमिका घेतलीय...शिवसेना सध्यातरी शिवाजी पार्कवर सभा घेण्यास उत्सुक नाही...वांद्रे-कुर्ला संकुलात एमएमआरडीए ग्राऊंडवर सभा घेण्य़ाचा विचार शिवसेनेत सुरु आहे.
 
न्यायालयानं शिवाजी पार्क शांतता क्षेत्र घोषित केल्यानं राजकीय पक्षांची कोंडी झालीय...याआधी दोनदा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला न्यायालयानं आवाजाची मर्यादा ठरवून अटीशर्तींसह परवानगी दिली होती...मात्र या अटीशर्तींचं शिवसेनेकडून उल्लंघन झाल...त्याबद्दल शिवसेनेला दंडही भरावा लागलाय...अशातच मनसेनं दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होतेय...त्यामुळे शिवसेनेच्या या अनुभवाचा विचार करता न्यायालय मनसेच्या मागणीवर काय निर्णय देतं याबाबत उत्सुकता असणार आहे.
 
 

First Published: Wednesday, January 18, 2012, 18:36


comments powered by Disqus