Last Updated: Monday, March 12, 2012, 19:12
www. 24taas.com, कोल्हापूर कराड-चिपळूण या नव्या रेल्वेमार्गासाठी राज्यशासनानं निधी मंजूर केलाय. त्यामुळं कोल्हापूर कोकणाला जोडला जाण्याची शक्यता मावळलीये. मुख्यमंत्र्यांनी आपल्या तालुक्यासाठी कोल्हापूरकरांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त होतेय. तसंच कोल्हापूरच्या इतर मागण्या रेल्वेकडून यावेळी तरी पूर्ण होतील अशी आशा आहे.
कोकण रेल्वे अस्तित्वात नसल्यापासून कोल्हापूर कोकणाशी रेल्वेनं जोडलं जाण्याची मागणी आहे. त्यानुसार गेल्या बजेटमध्ये कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणाही झाली, परंतु मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रवाशांची सोय न पाहता आपल्या राजकीय सोयीसाठी कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचा आग्रह धरत या मार्गाला मंजुरी आणल्याचा आरोप कोल्हापूरकर करतायत. तसंच यामध्ये कोल्हापूरचे राजकीय नेतृत्वही कमी पडल्यांचं करवीवासियांचं म्हणणं आहे.
कोल्हापूरकरांच्या इतर मागण्यांनाही रेल्वे मंत्रालयानं दरवेळी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत. कोल्हापूरचे रेल्वे स्टेशन हे मॉडेल स्टेशन म्हणून करण्याची घोषणा रेल्वे बजेटमध्ये केली होती ती अद्याप पूर्णत्वास आली नाही. कोल्हापूर-पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याची मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. कोल्हापूर-अहमदाबाद या गाडीच्या फे-या रोज सुरु कराव्यात. कोल्हापूर-हैदराबाद ही गाडी सोलापूरमार्गे सोडावी, कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट गाडी सोडण्यात यावी, कोल्हापूर- सातारा आणि कोल्हापूर-पुणे मार्गावर दर तासाला पॅसेंजर सुरु करण्यात याव्यात. अशा मागण्या दरवर्षी रेल्वे बजेटवेळी कोल्हापूरकर करत आलेत.
आता या बजेटमध्ये तरी कोल्हापूर-कोकणाला जोडण्यासंदर्भात सकारात्मक विचार होईल आणि इतर मागण्याही पु-या होतील. अशी आशा करवीरवासीय करतायत.
First Published: Monday, March 12, 2012, 19:12