Last Updated: Thursday, March 22, 2012, 23:30
www.24taas.com, मुंबई जिल्हापरिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवतं बाजी मारली आहे...काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या विरोधकांची मदत घेतलीय..य़ा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात नवीन राजकीय समीकरणं तयार झाली आहे.. राज्यातील जिल्हापरिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचा गजर झाला आहे.
राज्यातील 26 जिल्हापरिषदापैकी 13 जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज करण्यात यश मिळवलंय...त्यामुळे जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर आला आहे...सत्तेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने आपला सहकारी काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला आहे.. ठिकठिकाणी शिवसेना, भाजप आणि मनसेची मदत घेऊन राष्ट्रवादीने नंबर वन होण्याची किमया साधली आहे...खरंतर निवडणुकीच्या काळात ज्यांच्यावर कडाडून टिका केली त्याच पक्षांच्या मदतीने सत्तेचा सोपान गाठला आहे..
आज 26 झेडपीतील सत्तेचं समीकरणं पहाता राष्ट्रवादी काँग्रेसने 13 जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पदावर तसेच 14 उपाध्यपदावर विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 7 अध्यक्ष तर 4 उपाध्यक्ष पद मिळविण्यात यश आलं आहे...भाजपला 3 अध्यक्ष तसेच 3 उपाध्यक्ष पद मिळाली आहेत. शिवसेनेला 2 अध्यक्ष ,4 उपाध्यक्ष तर इतरांना 1अध्यक्ष आणि 1 उपाध्यक्षपद मिळालं आहे...राज्यातील 26 जिल्हापरिषदांवर नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच वर्चस्व सर्वचं विभागात दिसून येईल..काँग्रेसला त्या तुलनेत मर्यादीत यश आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर, नाशिक,सांगली, पुणे,सोलापूर, सातारा,बीड, परभणी,अमरावती,यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्हापरिषदेत अध्यक्षपद मिळवलं आहे ...तर काँग्रेसने सिंधुदुर्ग, कोल्हापूर, औरंगाबाद , नांदेड, लातूर, बुल़डाणा आणि वर्धा जिल्हापरिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे...भाजपने नागपूर, चंद्रपूर आणि जळगाव या जिल्हापरिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे...
या निवडणुकीत शिवसेनेला हिंगोली आणि जालना या दोन जिल्हापरिषदेत आपला अध्यक्ष बसवता आला आहे...रायगडमध्ये रिपाई ( आठवले गट)चा अध्यक्ष झाला आहे. 
हे सगळं राजकीय चित्र पहाता राज्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांना सत्तेपुढे आपल्या विचारधारेचा जणू विसर प़डल्याचं चित्र आहे...नेहमीच जातियदावादी म्हणून हिणवणा-या शिवसेना भाजपला काग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सोबतीला घेतलय...तर भ्रष्टाचारात बुडालेले पक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीची संभावना करणा-या शिवसेना, भाजप आणि राज ठाकरेंच्या मनसेनेही ठिकठिकाणी मदतीची रसद पुरवली आहे.
जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपले जुने हिशोब चुकते केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे... जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चालीमुळं अनेक ठिकाणी काँग्रेस चारमुंड्या चित झाली आहे...आणि त्यामुळेच आता दोन्ही काँग्रेसमध्ये या कारणावरुन कलगितुरा रंगला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 13 जिल्हापरिषदेतील अध्यक्षपद पटकावून राज्याच्या ग्रामीण भागात आपणच सर्वात पुढे असल्याचं दाखवून दिलं आहे...पण हे सत्तासमीकरण जुळवून आणतांना त्यांनी आपला मित्र पक्ष काँग्रेसला दूर ठेवून विरोधी पक्षांना सोबत घेण्याची राजकीय खेळी केली आहे...राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या नव्या युतीमुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे....जिल्हापरिषदेतील सत्तेसाठीराष्ट्रवादी काँग्रेसने आपले राजकीय विरोधक शिवसेना, भाजपशी जुळवून घेतलं आहे...जिल्हापरिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर काँग्रेसशी आघाडी करुन सत्ता स्थापण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसने घेतला होता...दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असती तर काँग्रेसला 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 ठिकाणी अध्यक्षपदाचा मान मिळाला असता......मात्र जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकांपूर्वी दोन्ही काँग्रेसमध्ये संदोपसुंदी असल्याचं उघड झालं होतं. - राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळी वाट चोखाळायला भाग पाडू नका असा सूचक इशारा पवारांनी दिला होता...आणि नेमकं तेच चित्र जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पहायला मिळालंय...राष्ट्रवादीने काँग्रेसला चकवा देत विरोधकांच्या मदतीने बाजी मारली....मात्र या निकालामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहे..राष्ट्रवादीशी आघाडी करण्यात काँग्रेसने मोडता घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय..तर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नसल्याचा प्रतिआरोप काँग्रेसने केलाय.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या युतीवर मुख्यमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली होती...त्यांच्या नाराजीलाही राष्ट्रवादी काँग्रेसने तिखट शब्दात उत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या युतीचा काँग्रेसला विदर्भात मोठा फटका बसला आहे..विदर्भात काँग्रेसला मोठं यश मिळूनही राष्ट्रवादीच्या खेळीमुळे सातपैकी केवळ दोन जिल्हापरिषदांमध्ये अध्यक्षपद आणि एका ठिकाणी उपाध्यक्ष पद मिळवता आलंय़...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकीय खेळीने काँग्रेस चांगलीच घायाळ झाली असून आगामी काळात त्याचे पडसाड उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरी भागातील पक्ष म्हणून राज ठाकरेंच्या मनसेची संभावना केली जात होती..पण जिल्हापरिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मनसेनें शिवसेना- भाजपच्या सत्तेला धक्का दिलाय..या निवडणुकीत मनसेनं काही ठिकाणी महत्वाची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना.. महानगरातील पक्ष असं काही दिवसांपर्यंत ज्याची संभावना केली जात होती तोच पक्ष आता नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हापरिषद अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेत निर्णायक ठरला आहे... जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले आणि राजकिय विश्लेषकांनी मनसेचे उमेदवार म्हणजे महायुतीला मदत असं समिकरण मांडलं होतं.. पण ठाण्यात महायुतीला मनसेनं मदत केल्यामुळं हा पॅटर्न जिल्हापरिषदेतही दिसण्याची शक्यता वर्तवली जात होती.
मात्र शिवसेनेनं नाशिकमध्ये वेगळी भूमीका घेतली आणि त्यांचा तोच हेकोखोरपणा त्यांना जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत नडला.. मनसेच्या इंजिनानं आपला ट्रॅक राष्ट्रवादीच्या यार्डात वळवला.. हा धक्का केवळ शिवसेनेला होता अस नाही तर कॉंग्रेसलाही होता.. जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी अस सांगणा-या राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनसेला पुरोगामी समजत युती केली आणि एकाचवेळी शिवसेना, कॉंग्रेसच्या स्वप्नावर पाणी फिरलं. मनसेच्या शिलेदारानी नाशिकचा वचपा काढायचा ठाम निर्धार करत ठाणे आणि औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीला थेट समर्थन दिलं.औरंगाबाद जिल्हा परिषदेत मनसेच्या पाठिंब्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मनसेनं 2 समित्यांचं अध्यक्षपद पदरात पाडून घेत आघाडीला पाठिंबा दिलाय. मनसेच्या या खेळीमुळं शिवसेना-भाजप युतीची गेल्या 10 वर्षांपासूनची सत्ता हातातून गेली आहे. औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या नईदाबानो फेरोझ या अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाताई निकम या उपाध्यक्षपदी विराजमान झाल्यायतं. खरतर ज्या औरंगाबादमध्ये मनसेप्रमुखानी राष्ट्रवादीविरोधात सभा घेत मौका सभी को मिलता है अशा तडाखेबंद संवादानी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हाण दिलं होतं...मात्र त्याच औरंगाबादेत मनसेला राष्ट्रवादीशी युती करावी लागलीय.. पण राजकारणात काहीही होवू शकत याच न्यायानं ठाण्यातही महापालिकेला शिवसेनेबरोबर असणारी मनसे जिल्हा परिषदेत मात्र कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या मदतीला धावलीय. पुणे पॅटर्नवर कायम तोंडसुख घेणारी मनसे पुण्यातही राष्ट्रवादी आणि सेनेच्या मदतीला धावल्यानं तिथ राष्ट्रवादीचा अध्यक्ष विराजमान झालाय.यवतमाळमध्येही एक अभुतपूर्व चित्र पहायला मिळालय. सत्तेसाठी कुठलीही युती करणार नाही अशी दावे करणारी मनसेनं माणिकरावांना एकट पाडण्यासाठी पुढे सरसावलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला, भाजपा, शिवसेनाच्या बरोबर राहत सत्ता स्थापन करण्यासाठी मदत केली. खरतर जिल्हा परिषदाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीवेळी अनेक समिकरण जुळतात.. ती त्या त्या प्रांतानुसार, आणि स्थानिक गणितानुसार योग्यही असतात. पण त्याचे राज्याच्या राजकारणात परिणाम होतचं नाही असे म्हणयाचे दिवस संपले.. कारण शिवसेनेला पुणे पॅटर्नचे अनुभव अजुनही भोगावे लागतायत.. मनसेसमोरचीही आव्हान आता वाढलीयत.. कारण शह काटशहासाठी केलेल्या नव्या युतीवरुन 2014च्या निवडणुकीत विरोधकही मनसेला कोंडीत पडल्याशिवाय़ राहणार नाहीत... राजकीय पक्ष सत्तेसाठी वाट्टेल त्या तडजोडी करायला तयार होतात हे जिल्हपरिषद निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे...काही ठिकाणी भाजपच्या साथिने राष्ट्रवादीने सत्ता मिळवलीय..तर काही ठिकाणी शिवसेना- भाजपला सत्ता स्थापण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने रसद पुरवलीय.
झेडपी इलेक्शनने राज्यात नव्य राजकीय समीकरणांना जन्म दिला आहे...निवडणुकांपूर्वी एकमेकांवर आरोपांची राळ उडविणा-या राजकीय पक्षांनी सत्तेसाठी सारकाही विसरुन एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आहेत..विशेषत: विदर्भात हा नवा पॅटर्न उदयास आला आहे..नागपूरमध्ये शिवसेना- भाजपने थेट राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेत जिल्हापरिषदेवर भगवा फ़डकवला आहे.
या जिल्हापरिषदेत पाठींब्याच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने उपाध्यक्ष पद पटकावलं आहे..राष्ट्रवादी काँग्रेसच्या या खेळीमुळे तिथं काँग्रेस एकाकी पडलीय..नागपूरमध्ये काँग्रेसने शिवसेना आणि भाजपच्या एक दोन सदस्यांना आपल्याकडं वळविण्याचा प्रयत्न केला होता..मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने सेना-भाजपला मदतीचा हात देत काँग्रेसच्या मनसुब्यावर पाणी फिरवलं आहे..
अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हात मिळवणी करुन सत्ता काबीज केलीय..अमरावती जिल्हापरिषदेत काँग्रेसने सर्वाधिक 25 जागा मिळवल्या आहे..मात्र असं असतांनाही काँग्रेसला सत्तेपासून दूर रहावं लागलं आहे..यवतमाळ जिल्हापरिषदेत तर एक वेगळीच युती समोर आलीय..यवतमाळ जिल्हापरिषदेच्या 50 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप,शिवसेना,आणि मनसे अशी नवी महायुती झालीय..काँग्रेस पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इथं सगळेच पक्ष एकत्र आले आहेत....अहमदनगर जिल्हापरिषदेतही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि भाजपच्या मदतीने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशी दोन्ही पद पटकावली आहे..राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेळीला शिवसेना- भाजपने मतदानावर बहिष्कार घालून एक प्रकारे पाठिंबाच दिला.. जिल्हापरिषदच्या या निवडणुकीत एकमेकांचं उट्ट काढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना आपल्या विरोधकांना साथ दिल्याच निकालातून स्पष्ट झालं आहे... जिल्हापरिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जी खेळी केली आहे ती पहाता राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे ..
First Published: Thursday, March 22, 2012, 23:30